कांदा लिलाव

राज्यातील या बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा लिलाव प्रक्रिया सुरू होणार!

राज्यातील या बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा लिलाव प्रक्रिया सुरू होणार!

नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्या वगळता अद्यापही अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे कोटींची उलाढाल ठप्प आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने लिलाव प्रक्रिया पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्यामुळेच उद्यापासून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लिलाव पूर्ववत होणार आहेत. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत घेऊन यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव ठप्प आहेत. लेव्हीचा प्रश्न सुटत नसल्याने हा तिढा कायम आहे. जवळपास पंधरा दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही दिवसांपासून लासलगाव सह इतर काही बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. आता सोमवारपासून लासलगाव नंतर मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाची बैठक पार पडल्यानंतर बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीतुन सूचित करण्यात आले की, सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधव व मार्केट घटकांना कळविण्यात येते की, सोमवार 22 एप्रिल 2024 रोजी पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पिंपळगाव बसवंत मुख्य बाजार आवार, जोपुळ रोड येथे कांदा या शेतीमालाचे दैनंदिन लिलावाचे कामकाज सुरू होत आहे. तरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल प्रतवारी करून विक्रीस आणावा. तसेच पुढील निर्णय होई पावेतो शेतमाल विक्रीचे हिशोबपट्टीवर हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात होणार नाही, याची सर्व शेतकरी बांधव, आडते/खरेदीदार, हमाल-मापारी व मार्केटच्या इतर घटकांनी याची नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे एकप्रकारे या बाजार समितीवर अवलंबून असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर सचिव संजय लोंढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने सर्वानुमते बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून कांदा आवक बोलावली आहे. या बाजार समितीत दररोज दहा ते बारा हजार क्विंटल आवक होत आहे. मात्र मागील काही दिवस बाजार समिती बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. मात्र आता बाजार समिती कामकाज पुन्हा पूर्वपदावर येऊन उद्यापासून नेहमीप्रमाणे कांदा लिलाव सुरू होतील.