गुलाबी बोंड अळी नियंत्रणात क्रांती? ‘एआय’ तंत्रज्ञानाची नवी वाटचाल!
कापसातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ‘पोकरा’ (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) प्रकल्पात या वेळी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून लवकरच दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील शेती हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असावी या उद्देशाने २१ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामध्ये विदर्भातील ११, मराठवाड्यातील ८ त्यासोबतच जळगाव, नाशिक या दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव नव्याने करण्यात आला आहे.
जागतिक बँकेच्या निधीतून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. यंदा या प्रकल्पात नावीन्यपूर्ण बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्याकरिता लवकरच केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच पोकरा या दोन्ही यंत्रणांमध्ये सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
…असे होते काम
कामगंध सापळ्यात नर पतंग व त्यांची मोजदाद केली जाते. त्याआधारे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीवर आहे किंवा नाही याची निश्चिती होते. यात निरीक्षणाचे महत्त्व असल्याने मॅन्युअली हे काम तितके प्रभावी शक्य होत नाही. एआय तंत्रज्ञानाचा वापर करीत नर पतंगाची ओळख आणि मोजदाद करून हा डाटा संशोधन संस्था तसेच शेतकऱ्याला पाठविला जातो. त्याआधारे किडीची नुकसान पातळी वेळीच कळणे शक्य होत नुकसान टाळता येते.
‘एआय’चा प्रायोगिक तत्त्वावर वापर
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठीच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी गेल्या हंगामात पहिल्यांदा पंजाब मधील मुक्तसर, भटिंडा तसेच मानसा या तीन जिल्ह्यांत केली. प्रत्येक जिल्ह्यातील तीन याप्रमाणे १८ शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रकल्प राबविण्यात आला.
हे पण वाचा : रब्बी पिके योग्य वेळी काढा, नुकसान टाळा! जाणून घ्या काढणीसाठी सर्वोत्तम वेळ