अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला
मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होत आहेत. कधी तापमानात वाढ तर कधी अवकाळीच्या सरी बरसतात. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे.
हवामान अंदाज आणि चेतावणी:
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात ६ ते ८ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
– पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही, त्यानंतर ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
– किमान तापमानातही पुढील २४ तासात फारशी तफावत जाणवणार नाही, त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला:
– पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
– बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे.
पीक व्यवस्थापन:
ऊस:
– ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
– तण नियंत्रणासाठी खुरपणी करावी.
– खोड कीड नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २०% @२५ मिली किंवा क्लोरेंट्रानोलीप्रोल १८.५% @४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३०% @३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद:
– काढणीस तयार हळदीची काढणी करून घ्यावी व सुरक्षित साठवणूक करावी.
– हळद उकडणे, वाळवणे ही कामे पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करावीत.
तीळ:
– मध्यम जमिनीत ८-१० दिवसांनी व भारी जमिनीत १२-१५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
– शक्य असल्यास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
फळबाग व्यवस्थापन:
– संत्रा/मोसंबी: काढणीस तयार फळांची काढणी करून घ्यावी व संध्याकाळी पाणी द्यावे.
– डाळिंब: लहान झाडांना काठीने आधार द्यावा व सकाळी/संध्याकाळी पाणी द्यावे.
– चिकू: काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
– वादळी वाऱ्यामुळे पडलेली फळे नष्ट करावीत, मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
भाजीपाला व्यवस्थापन:
– काढणीस तयार भाजीपाला त्वरित काढून सुरक्षित साठवणूक करावी.
– रसशोषक कीड नियंत्रणासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाचीन १५% @१० मिली किंवा डायमेथोएट ३०% @१३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती:
– खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
– आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
– काढणीस तयार फुलांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग:
– काही शेतकऱ्यांच्या तुती पिकात कोष न होण्याची समस्या दिसून आली आहे.
– यासाठी शिफारस केलेले २० टन शेणखत किंवा ५ टन गांडूळखत प्रति हेक्टर प्रति वर्ष वापरावे.
शेतकऱ्यांनी या सल्ल्याचा अवलंब करून आपल्या पिकांचे योग्य संरक्षण करावे आणि संभाव्य नुकसान टाळावे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात शरीराचे संतुलन कसे राखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचे आहारविषयक मार्गदर्शन!