टरबूज-खरबूज लागवडीत उत्पादन वाढवायचंय? मग ‘हे’ खास तंत्र जाणून घ्या!

टरबूज-खरबूज लागवडीत उत्पादन वाढवायचंय? मग ‘हे’ खास तंत्र जाणून घ्या!

 

उन्हाळ्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर टरबूज आणि खरबूज पिकांची शेती करतात. मात्र अनेकदा अपुऱ्या व्यवस्थापनेमुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परिणामी उत्पादनावर केलेला खर्च ही निघत नाही. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हमखास उत्पादनाचे सुधारित टरबूज आणि खरबुज लागवड तंत्र.

 

 

टरबूज- सिटुलस व्हलगॅरिस (वॉटर मेलॉन).

 

जमीन : टरबूज पिकासाठी हलकी, पोयट्याची, वाळु मिश्रित व पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस उपयुक्त आहे. चुनखडीयुक्त व चोपण जमिनीत टरबुजाची लागवड करू नये.

 

हवामान : प्रामुख्याने उन्हाळयात घेतले जाणारे हे पीक २५ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगला प्रतिसाद देते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. वातावरणामध्ये थंडी, दमटपणा किंवा धुके असल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. भर पावसाळ्याचे दिवस सोडल्यास वर्षभर कलिंगडाची लागवड करता येते.

 

सुधारीत जाती : शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती तसेच टरबुजाच्या खाजगी कंपन्यांच्या भरपूर जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शुगर क्वीन जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

 

बियाणे प्रमाण : साधारणतः टरबुजाच्या लागवडीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी अडीच ते तीन किलो बियाणे पुरेसे आहे तर संकरीत जातीचे ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे प्रती हेक्टरी आवश्यक आहे.

 

बियाणे प्रमाण : साधारणतः टरबुजाच्या लागवडीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी अडीच ते तीन किलो बियाणे पुरेसे आहे तर संकरीत जातीचे ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे प्रती हेक्टरी आवश्यक आहे.

 

लागवड : टरबुजाची लागवड डिसेंबरचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारी मध्यापर्यंत करता येते. या पिकाची लागवड गादीवाफ्यावर देखील करता येते.

 

अन्नद्रव्य व्यवस्थापन : लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून १५ ते २० टन शेणखत प्रती हेक्टरी द्यावे. लागवडीपूर्वी ५०:५०:५० किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.

 

पाणी व्यवस्थापन : टरबूजाच्या पिकाकरीता पाण्याचे योग्य वेळी नियोजन करणे आवश्यक आहे. टरबूजाचे पीक जसे वाढेल तसे पाण्याची गरजही वाढते. फळ लागण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा पिकांच्या मुळांशी जास्त संपर्क आल्यास रोग पडण्याची शक्यता जास्त असते.

 

काढणी व उत्पादन : टरबूजाचे फळ पिकल्यावर देठ सुकतात. पुर्ण पक्च झालेले टरबूजातून बोटाने वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो. तसेच जमिनीवर टेकवलेला टरबुजाचा भाग पिवळसर पडतो. तसेच पिकाचा कालावधी ९० ते १२० दिवसांचा आहे. योग्य व्यवस्थापन व रोग कीड नियंत्रण केल्यास टरबूजाचे हेक्टरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते.

 

 

खरबूज – कुकुमिस मेलो (मस्क मेलॉन)

 

जमीन : खरबूज पिकासाठी हलकी, पोयट्याची जमीन लागवडीस उपयुक्त आहे. चुनखडीयुक्त व चोपण जमिनीत खरबुजाची लागवड करू नये.

 

हवामान : प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक २४ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगला प्रतिसाद देते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. वातावरणामध्ये थंडी, दमटपणा किंवा धुके असल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.

 

सुधारित जाती : पुसा शरबती, दुर्गापुर मधु, अर्का जीत, अर्का राजहंस, पंजाब सुनहरी. तसेच खरबूजाच्या खाजगी कंपन्यांच्या भरपुर जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीमध्ये कुंदन ही जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

 

बियाणे प्रमाण : खरबुजाच्या लागवडीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी दीड ते दोन (१.५-२) किलो बियाणे पुरेसे आहे तर संकरीत जातीचे २०० ते २५० ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी आवश्यक आहे.

 

लागवड : खरबुजाची लागवड डिसेंबरचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारी मध्यापर्यंत करता येते. या पिकाची लागवड रोपे तयार करून किंवा टोकन पद्धतीने करता येते. लागवडीचे अंतर १.५ x १.० मीटर ठेवावे.

 

पाणी व्यवस्थापन : खरबुजाच्या पिकाकरीता पाण्याचे योग्य वेळी नियोजन करणे आवश्यक आहे. खरबूजाचे पीक जसे वाढेल तसे पाण्याची गरजही वाढते. फळ लागण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही याची विशेष काळजी घोणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा पिकांच्या मुळांशी जास्त संपर्क आल्यास रोग पडण्याची शक्यता जास्त असते.

 

काढणी व उत्पादन : खरबूजाचे फळ पिकल्यावर मधुर व सुवासिक वास येतो. तसेच काढणी योग्य झालेल्या खरबूजाचे देठ सुकतात. या पिकाचा कालावधी १० ते १०० दिवसांचा असून २० ते २५ दिवसात काढणी पूर्ण होते. योग्य व्यवस्थापन व रोग कीड नियंत्रण केल्यास खरबूजाचे हेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते.

 

 

विशेष बाब

 

टरबूज व खरबूज या पिकामध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन याचा वापर केल्यास उत्पादनामध्ये होणारी वाढ ही उल्लेखनीय आहे. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे या पिकांच्या गुणवत्तेचा दर्जा हा अत्यंत चांगला राहतो. तसेच कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्यास मदत होते.
ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते दिल्यास हि पिके उत्पादन वाढीसाठी चांगला प्रतिसाद देतात.
टरबूज व खरबूज ही पिके सुरूवातीच्या काळात रोग किडींना बळी पडत असल्यामुळे या पिकांसाठी सुरूवातीच्या काळात क्रॉप कव्हरचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com