पेरणीपूर्वी बियाण्यांची सोपी तपासणी करा; घरची असो की विकतची!
खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते – कुणी शेतीची मशागत करतंय, तर कुणी बियाण्यांची तयारी करतंय. पण यशस्वी उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बियाण्याची निवड. योग्य आणि उगवणक्षम बियाणं वापरल्यास उत्पादनात मोठी वाढ होते, तर चुकीच्या बियाण्यामुळे मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो.
बाजारातील बियाणं महाग, पण खात्रीशीर?
बाजारात मिळणारी बियाणं ही महाग असतात, पण त्यांची उगवणक्षमता हमखास आहेच असं नाही. त्यामुळे पेरणीपूर्वी अगदी घरच्या घरी एक साधी आणि सोपी चाचणी करून बियाणं उगवणक्षम आहेत की नाही, हे तपासणं अत्यावश्यक आहे.
गोणपाट वापरून बियाण्याची उगवण क्षमता चाचणी – पायरी पायरीने मार्गदर्शन
साहित्य
• गोणपाटाचे 6 चौकोनी तुकडे
• 100 बियाण्यांचे नमुने (3 वेळा)
• पाणी
• थंड व सावलीचे ठिकाण
कशी कराल चाचणी?
1. नमुना तयार करा:
प्रत्येक बियाण्याच्या पोत्यातून मुठभर धान्य घ्या. सर्व पोत्यातील धान्य एकत्र करा.
2. गोणपाट मांडणी:
स्वच्छ धुतलेला एक गोणपाटाचा तुकडा जमिनीवर पसरवा.
3. बियाण्यांची रचना:
सरसकट १०० दाणे मोजा. १०-१० च्या रांगेत, दोन से.मी. अंतरावर, गोणपाटावर रचून ठेवा. असे ३ नमुने तयार करा.
4. पाणी शिंपडा:
गोणपाट ओला करून त्यावर बियाणं ठेवा. दुसऱ्या गोणपाटाने त्याला झाका व पुन्हा पाणी शिंपडा.
5. गुंडाळी करा:
गुंडाळी करून थंड, सावलीच्या ठिकाणी ठेवा. दररोज थोडं पाणी शिंपडून गोणपाट ओलसर ठेवा.
6. ६-७ दिवसांनी तपासणी:
गुंडाळी उघडून उगवलेले दाणे मोजा. प्रत्येक नमुन्याची सरासरी काढा.
चाचणीचे परिणाम काय सांगतात?
• ७० किंवा त्याहून अधिक दाणे उगवले असतील:
हे बियाणं वापरण्यास योग्य आहे. शिफारशीनुसार प्रमाणात पेरणी करा.
• ७० पेक्षा कमी दाणे उगवले असतील:
बियाण्याचं प्रमाण थोडं वाढवून पेरणी करा.
पेरणीपूर्वी बियाण्यांना बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करायला विसरू नका. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि उगवण आणखी सुधारते.
बियाण्यांची उगवण चाचणी ही एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचते, तसेच खरीप हंगाम यशस्वी होण्याची खात्री वाढते.
पेरणीपूर्वी चाचणी करा आणि भरघोस उत्पादनाची खात्री मिळवा!
हे पण वाचा : शेततळ्यासाठी योग्य जागा कशी निवडावी? जाणून घ्या सविस्तर