उन्हाळी मका पिकातील लष्करी अळी नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय
उन्हाळ्यात मका पिकाची लागवड मुख्यतः चाऱ्यासाठी केली जाते. या चाऱ्याचा उपयोग मुरघास (Silage) तयार करण्यासाठी होतो, जो जनावरांसाठी उत्तम पोषणयुक्त आहार मानला जातो. मात्र, या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm) या कीडाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अनेक शेतकरी या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. पण अशा चाऱ्याचा वापर जनावरांच्या आहारात केल्यास त्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे जैविक आणि सुरक्षित उपायांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
लष्करी अळीवर जैविक नियंत्रणासाठी उपाय योजना
1. वेळेवर आणि सामूहिक लागवड
• एका भागात एकाच वेळी मका लागवड केल्यास अळीचा प्रादुर्भाव मर्यादित ठेवता येतो.
• यामुळे अळीच्या वाढीचा चक्र पूर्ण होण्याआधीच ती नियंत्रित करता येते.
2. सरी-वरंबा पद्धतीचा वापर
• या पद्धतीमुळे पाणी व्यवस्थापन चांगले होते आणि अळीचा फैलाव मर्यादित होतो.
3. रासायनिक खतांचा मर्यादित वापर
• खतांचे योग्य प्रमाणात व शिफारशीप्रमाणे वापर केल्यास अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
• रासायनिक खतांचा अतिरेक अळीच्या वाढीस पोषक ठरतो.
4. मित्रकीटकांना आकर्षित करणारी पीक लागवड
• मका पिकाच्या बांधावर झेंडू, सूर्यफूल यांसारख्या फुलझाडांची लागवड केल्यास नैसर्गिकरीत्या अळीचा बळी घेणारे मित्रकीटक आकर्षित होतात.
5. सापळा पीक: नेपिअर गवत
• मका पिकाच्या भोवती नेपिअर गवताच्या ३–४ ओळी लावाव्यात. अळी या गवतावर अंडी घालते, त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान टळते.
• पिकाचे नियमित निरीक्षण व नियंत्रण
6. पक्षी थांबे उभारणे
• एकरी १० पक्षी थांबे लावल्यास अळी खाणारे पक्षी वाढतात आणि कीड नियंत्रणात मदत होते.
7. कामगंध सापळे (Pheromone Traps)
• प्रति एकर ४ कामगंध सापळे लावून अळीच्या पतंगांची उपस्थिती तपासावी.
• दररोज सापळ्यात अडकलेल्या पतंगांची नोंद घ्यावी.
• जर सापळ्यांमध्ये दररोज एकापेक्षा जास्त पतंग सापडत असतील, तर सापळ्यांची संख्या वाढवावी.
8. हाताने गोळा करून नष्ट करणे
• डोळ्यांना दिसणाऱ्या अळी किंवा अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
जैविक कीटकनाशकांची फवारणी
जर अळीचा प्रादुर्भाव ५–१०% झाला असेल, तर खालीलपैकी एक उपाय करावा:
• बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी (Bt) हे जैविक कीटकनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये मिसळून फवारणी करावी.
• किंवा, मेटा-हायझियम एनिसोप्ली / बिव्हेरिया बॅसियाना यापैकी कोणतेही जैविक कीटकनाशक ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये मिसळून फवारणी करावी.
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा धोका लक्षात घेता, कीटकनाशकांचा वापर टाळून जैविक उपायांचा अवलंब करणे सुरक्षित आणि शाश्वत ठरते. यामुळे पिकाचे संरक्षण होतेच, शिवाय जनावरांचाही आरोग्यदृष्ट्या धोका टळतो.
हे पण वाचा : राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; या जिल्ह्यांना यलो अलर्ट