मका पिकावर मर रोग टाळण्यासाठी यंदा काय उपाय कराल?
खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यात साधारणपणे 2.70 लाख हेक्टर क्षेत्रावर मका पीक लागवड होणार आहे. मात्र, गतवर्षी मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने यंदा वेळीच योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक येथील कृषी उपसंचालक महेश वेठेकर यांनी शेतकऱ्यांनी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी पुढील उपाय त्वरित करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मर रोग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना
1. पीकांची फेरपालट करा
मागील वर्षी ज्या जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, त्या जमिनीत यंदा मका पीक घेणे टाळावे. त्याऐवजी दुसरे पीक घेण्याचा विचार करावा.
2. खोल नांगरट व अवशेष व्यवस्थापन
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून शेतातील बुरशी व कीटक नष्ट करावेत. शेतीतील काडीकचरा आणि मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
3. पाण्याचे योग्य नियोजन
फुलोऱ्याच्या कालावधीत पिकाला ताण पडणार नाही याची काळजी घ्या. पाण्याची अयोग्य मात्रा किंवा ताण मका पिकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो.
4. संतुलित खत व्यवस्थापन
माती परीक्षण करून त्यानुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा. पेरणीच्या वेळी पोटॅश खताचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
5. बीजप्रक्रिया करणे आवश्यक
बियाण्यांना थायरम 3 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
पर्यायी उपाय म्हणून, 4 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्रति एकर शेणखतात मिसळून शेतात टाकावे.
ट्रायकोडर्मा कुठे मिळेल?
ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशीनाशक पावडर खालील ठिकाणी उपलब्ध आहे:
• कृषी विज्ञान संकुल, काष्ठी, ता. मालेगाव, जि. नाशिक
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), नाशिक
• कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
• राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितेगाव, ता. निफाड, जि. नाशिक
शेतकरी बंधूंनो, मका पिकावर मर रोगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळेत योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. फेरपालट, खोल नांगरट, योग्य बीजप्रक्रिया आणि संतुलित खत वापर करून आपण मका पीक निरोगी ठेवू शकतो आणि उत्पादनात वाढ साधू शकतो.
हे पण वाचा : द्राक्ष वेली सुकतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय!