भाजीपाला पिकातील बगल फूट आणि तणावे कधी काढावेत? संपूर्ण माहिती!
उन्हाळी हंगामात (Summer Season) भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या पिकांसाठी मांडव आणि ताटी पद्धत आधार देण्यासाठी वापरली जाते. यात वर जाणाऱ्या फांद्या या आडव्या तारेला दोन पदरी पद्धतीने बांधल्या जातात.
मुख्य वेलीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी बगल फूट आणि तणावे काढणे गरजेचे ठरते. विशेषतः मंडप आणि ताटी पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बगल फुटवे आणि तणावे काढले जातात. ते नेमके कसे हे जाणून घेऊया.
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधील बगल फूट आणि तणावे काढण्याचे महत्त्व
– वेल वाढत असताना बगलफूट आणि तणावे काढावेत, मात्र पाने काढू नयेत.
– वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफूट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळते.
– वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड केल्यापासून २० ते २५ दिवसांनी वेल ताटी किंवा मंडपावर सोडण्यासाठी सुतळीच्या साहाय्याने वर चढवावेत.
– तसेच मंडप पद्धतीमध्ये वेल मंडपावर पोहोचल्यानंतर सर्व बगलफूटी काढाव्यात.
– ताटी पद्धतीमध्ये पहिल्या तारेपर्यंत वेलीवरच्या बगलफुटी काढून टाकाव्यात, त्यानंतर बगलफुटी किंवा फांद्या काढू नयेत.
– मुख्य वेल मंडपावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा आणि राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.
बगल फूट आणि तणावे काढण्याचे फायदे
– मुख्य वेलीची व्यवस्थित वाढ होते.
– फळधारणा अधिक चांगली होते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो.
– वेलीमध्ये योग्य प्रमाणात हवा खेळती राहते, त्यामुळे बुरशीजन्य आणि कीडसंबंधित आजार कमी होतात.
– ऊर्जेचा योग्य वापर होऊन झाडाची पोषण क्षमता वाढते.
भाजीपाला उत्पादनामध्ये योग्य वेळी बगल फूट आणि तणावे काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मांडव आणि ताटी पद्धतीनुसार योग्य नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी ही प्रक्रिया करून चांगल्या उत्पादनासाठी तयारी करावी.
हे पण वाचा : जनावरांतील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी प्रभावी उपाय