आज राज्यात कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रागयड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
ज्या भागात चांगला पाऊस त्या भागातील पेरण्या पूर्ण
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र 20.90 लाख हेक्टर असून 8 जुलै 2024 पर्यंत जिल्ह्यात 18.91 लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमूग या पिकांच्या पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले.
पूर्व विदर्भात पावसाची प्रतीक्षा
दरम्यान, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने दांडी दिल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे. गेल्या वर्षी अल निनोचा परिणाम होता. त्यामुळे समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदा मात्र, राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचं चित्र दिसत आहे.