Cholesepticemia

कोंबड्यांमधील कोलीसेप्टीसेमिया आजार

कोंबड्यांमधील कोलीसेप्टीसेमिया आजार

कोलीसेप्टीसेमिया हा सर्व वयाच्या कोंबड्या आणि बदकांना जीवाणूद्वारे होणारा आजार आहे. ब्रॉयलर कोंबडीमध्ये हा आजार जास्त आढळतो. जिवाणू संसर्गानंतर बाधित कोंबड्यांमध्ये रक्तदोष (सेप्टीसेमिया) तयार होऊन मरतुक होते.

या आजारात शारीरिक वृद्धी कमी होते. बाधित कोंबडीमध्ये होणारी मरतुक अतिशय जास्त असते. कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या कोंबड्यांमध्ये आजाराची तीव्रता जास्त दिसून येते.

कारणे आणि प्रसार

  • आजार एस्चेरिशिया कोली जिवाणू संसर्गामुळे होतो.
  • आजार कोंबड्या, बदक, इत्यादी प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये आढळतो.
  • आजार सर्व वयाच्या कोंबड्यांमध्ये आढळून येतो. मात्र वयाच्या ५ ते १० व्या आठवड्यादरम्यान जास्त प्रमाणात दिसून येतो.
  • खाद्यामध्ये कवकापासून तयार झालेले विष असल्यास या आजारास पूरक ठरते. आजाराचा प्रादुर्भाव वाढतो.
  • दूषित लिटर, खाद्य आणि पाण्यातून आजाराचा प्रसार होतो.
  • शेडमधील उपकरणे, पाण्याची भांडी, नळ, पाइप्स, टाक्या, पाण्याचे स्रोत दूषित झाल्यास आजार पसरतो.
  • बाधित कोंबडीच्या विष्ठेत जिवाणू उत्सर्जित होत असल्याने, शेडमधील वातावरण प्रदूषित होते. त्याद्वारे संक्रमण वाढते.
  • जंगली पक्षी, उंदीर, घुशी यांच्या मलमूत्रामध्ये कोलाय जिवाणू दिसून येतात. त्याद्वारे आजाराचा प्रसार होतो.

आजाराची लक्षणे

पिल्लांमधील लक्षणे

  • हगवण लागते. गुदद्वाराच्या सभोवती पंखांना विष्ठा चिकटलेली दिसून येते.विष्ठा चिकट होते.
  • बाधित पिल्लांना श्वसनास त्रास होतो. न्यूमोनिया होतो.

प्रौढ कोंबड्यांमधील लक्षणे

  • आजारी कोंबड्या सुस्त दिसून येतात. त्यांना शिंका येतात, श्वास घेण्यास त्रास होतो.
  • पंख सैल करून मान त्यात किंवा खाली घालून बसून राहतात. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
  • अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचे प्रमाण कमी होते. कोंबड्यांचे वजन कमी होते.
  • साधारणपणे ५ ते १० टक्के मरतुक होत असली तरी ५० टक्के पर्यंत वाढू शकते.
  • हृदयाच्या बाहेरील आवरणावर पांढऱ्या पदार्थाचे आवरण तयार होते. आवरणात पांढरा पदार्थ दिसून येतो.
  • आतडे, यकृत, मुत्र पिंडे, फुफ्फुस आणि प्लिहा या अवयवांत सूज आणि रक्त संकुलता दिसून येते.
  • वायुकोश सुजून ढगांसारखा अस्पष्ट दिसतो. त्यात केसीअस द्रव साचते.
  • यकृत आणि पोटाच्या स्नायूंवर पांढऱ्या पदार्थाचे आवरण दिसून येते.

निदान

  • लक्षणांवरून निदान करणे कठीण असते.
  • व्याधीकीय परीवर्तानांवरून आजाराचे निदान करता येते.
  • आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेत जिवाणू संवर्धन आणि ओळख करावी लागते.

प्रतिबंध आणि उपचार

  • जैवसुरक्षेचा अवलंब न केल्यास प्रादुर्भाव दिसून येतो.
  • माशा, जंगली पक्षी, उंदीर, घुशीचा बंदोबस्त करावा.
  • बाहेरील व्यक्ती, जनावरे आणि जंगली पक्षांना शेडमध्ये प्रवेश देऊ नये.
  • कोंबड्या ठेवण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
  • खाद्य, पाण्याची भांडी आणि इतर साहित्य नियमित स्वच्छ करावे.
  • शेडमध्ये खाद्य आणि पाण्याची साठवणूक करू नये.
  • शेडमध्ये धूळ किंवा धूळयुक्त लिटर असू नये. योग्य मात्रेत प्रकाश असावा. शेड हवेशीर असावी.
  • लिटरची नियमित फेरफार करावी. तसेच चुन्याची भुकटी मिसळावी.
  • दूषित खाद्य आणि पाणी देऊ नये.
  • कोंबड्यांना खाद्यातून किंवा पाण्यातून योग्य मात्रेत नियमितपणे जीवनसत्वे आणि खनिजे द्यावी.
  • कोंबड्यांची गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
  • शेडमध्ये जात असताना पाय निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत. निर्जंतुक द्रावण दर आठवड्याला बदलावे.
  • उबवणुकीची अंडी गरम (४५ अंश सेल्सिअस) पाण्यात बुडवून क्लोरीन ने जिवाणूंचा नाश करावा.
  • पाण्याचे नियमितपणे क्लोरिनेशन करावे. एकूण जिवाणू आणि इ.कोली संख्या प्रयोगशाळेत तपासून घ्यावी.
  • आजारी कोंबड्यांना तज्ज्ञांच्या सल्याने योग्य मात्रेत प्रतिजैविके द्यावी. प्रतीजैविकांचा कालावधी पूर्ण करावा.
  • मध्येच प्रतिजैविके देणे थांबविल्यास आजाराचा पुनः उद्रेक होऊ शकतो. ब जीवनसत्वे आणि इलेक्ट्रोलाईट द्यावे.
  • खाद्यातून सी जीवनसत्त्व दिल्यास आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होते.
  • मृत कोंबड्यांनाखोल पुरून टाकावे. उघडयावर टाकू नये.
  • शेडमधून आजाराचा नायनाट करावयाचा असल्यास सर्व कोंबड्यांना काढून टाकावे.
  • शेड तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.

डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९,

(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला )

 

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com