जुलै महिन्यात पाऊस कसा राहणार? कुठं कुठं पडणार पाऊस?

जुलै महिन्यात पाऊस कसा राहणार? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर

जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल. कुठे कुठे पाऊस पडणार? याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. तर काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. दरम्यान, चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर ज्या ठिकाणी कमी पाऊस झालाय, त्या ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल. कुठे कुठे पाऊस पडणार? याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
जुलै महिन्यात ‘या’ भागात पडणार पाऊस
महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिराव खुळे यांनी दिली आहे. तसेच दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण माण खटाव माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के  किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक जाणवते असे खुळे म्हणाले.

‘या’ जिल्ह्यात 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडणार
जळगांव, संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे 3 वाजताचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात पहाटे 5 चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे. ऑगस्ट महिन्यात ‘ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी असे कुळे म्हणाले.

मान्सूनने काबीज केला संपूर्ण देश
मान्सूनने संपूर्ण देश काबीज केला आहे. मान्सून ट्रफ स्थापित झाला असून सरासरी जागेपासून अधिक उत्तरेला आहे. अरबी समुद्रात किनार पट्टीसमोर दक्षिणोत्तर आस असून गुजराथ भुभाग व दक्षिण किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.