तिन्ही हंगामात येणारा तिळाचा नवा वाण; परभणी कृषी विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण संशोधन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या नव्या तीळ वाणाला केंद्र सरकारकडून देशपातळीवर मान्यता प्राप्त झाली आहे. या वाणाला केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. हे विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे द्योतक आहे.
तिन्ही हंगामात लागवडीसाठी मान्यता
टीएलटी-१० वाण आता खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे.
या वाणाची लागवड महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१) या राज्यांमध्ये करता येईल.
तसेच, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागात (झोन-३) खरीप हंगामासाठी लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.
हा वाण ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आला होता.
वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म
• ९०-९५ दिवसांत परिपक्व होणारा वाण
• प्रति हेक्टर ७ ते ८ क्विंटल उत्पादनक्षमता
• ४५.२% तेलाचे प्रमाण
• मॅक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी या रोगांवर सहनशील
• पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या किडींवरही सहनशील
संशोधनामागे शास्त्रज्ञांची टीम
या महत्त्वपूर्ण संशोधनामागे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले असून, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आणि इतर शास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे.
कुलगुरूंनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत सांगितले की, “टीएलटी-१० वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तापूर्ण तीळ उत्पादनाची संधी मिळणार आहे. यामुळे देशातील तीळ उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.”
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, “या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे. टीएलटी-१० चे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
हे पण वाचा : मुरघास कसे तयार करावे? – शेतीतील पशुखाद्य साठवणुकीची प्रभावी पद्धत