शेवटची संधी! आजच करा रब्बी हंगामाची ई-पीकपाहणी किंवा गमवा महत्त्वाचे लाभ!
राज्यात रब्बी हंगामाची ई-पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीचा बुधवारी (ता. १५) शेवटचा दिवस आहे. मुदतीत ई-पीकपाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी तलाठीस्तरावर देण्यात आलेली आहे.
राज्यात पूर्वी राज्य शासनाच्या प्रणालीतून ई-पीकपाहणी केली जात होती. आता केंद्राने डीसीएस (डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे राज्याने आधीची प्रणाली बंद करीत पूर्णतः केंद्र शासनाच्या पद्धतीने ई- पीकपाहणी करण्याची पद्धत स्वीकारली आहे.
अर्थात, यामुळे शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ई-पीकपाहणी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा आलेला नाही. रब्बी हंगामाची शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक डिसेंबरपासून सुरू झाली आहे.
महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, रब्बी हंगामातील पिकांची ई-पीकपाहणी करण्याचे राहून गेले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आज दिवसभरात पीकपाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी. पिकाचे नुकसान झाल्यास ई-पीकपाहणीवरील नोंदी महत्त्वाच्या ठरतात. तसेच, अनुदान, विमा व शेतीमालाच्या विक्री प्रक्रियेतदेखील ई-पीकपाहणीचा पुरावा मोलाचा ठरतो.