उन्हाळ्यात जनावरांना किती पाणी लागते आणि ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर
उन्हाळा तीव्र होत असताना, आपल्याला जसे नियमित शुद्ध आणि पुरेसे पाणी पिण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जनावरांसाठीही शुद्ध आणि पुरेसे पाणी आवश्यक आहे. दूध उत्पादन आणि जनावरांच्या आरोग्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच शरीर स्वच्छतेसाठी केला जातो.
जनावरांसाठी पाण्याचे महत्त्व
• जनावरांच्या शरीरातील कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे.
• रवंथ करणाऱ्या जनावरांसाठी पचन आणि किण्वन प्रक्रियेसाठी पाणी आवश्यक असते.
• शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि पोटातील आम्लता नियंत्रित ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे.
• पाण्याची कमतरता असल्यास जनावरे कमी आहार घेतात, ज्यामुळे दूध उत्पादन घटते आणि आरोग्यावर परिणाम होतो.
उन्हाळ्यात जनावरांना किती पाणी लागते?
• मोठ्या निरोगी जनावराला दररोज ७० ते ८० लिटर पाणी लागते.
• २० ते २५ लिटर पाणी जनावरांच्या स्वच्छतेसाठी किंवा गोठ्यातील वातावरण थंड ठेवण्यासाठी वापरले जाते.
• उन्हाळ्यात म्हशींना दिवसातून दोन वेळा पाण्याने अंघोळ घालणे फायदेशीर ठरते.
• दूध उत्पादनासाठी एक लिटर दुधासाठी साधारण २.५ ते ३ लिटर पाणी पाजणे आवश्यक आहे.
• जनावरांना कमीत कमी पाच वेळा पाणी पाजणे गरजेचे आहे.
जनावरांना पाणी देताना घ्यावयाची काळजी
• पाणी नेहमी स्वच्छ आणि चवदार असावे; अस्वच्छ पाणी जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
• पाणी साठवण्यासाठी हौद किंवा टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात आणि पंधरा दिवसांतून एकदा चुण्याने रंगवाव्यात.
• जनावरांच्या पाणी पिण्याच्या भांड्यांची उंची योग्य असावी, जेणेकरून ते सहज पाणी पीऊ शकतील.
• पाण्याचा सामु (pH) सातच्या जवळ असावा, खूप अल्कलाइन किंवा अॅसिडिक नसावा.
• पाणी सहज उपलब्ध असावे, जेणेकरून तहान लागल्यावर जनावरांना सहज पिता येईल.
योग्य प्रमाणात शुद्ध पाणी मिळाल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादन वाढते आणि उन्हाळा अधिक सुसह्य होतो. त्यामुळे पशुपालकांनी नियमित आणि पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची काळजी घ्यावी.
हे पण वाचा : चालू आर्थिक वर्षात साखर निर्यातीत वाढ; कोणत्या देशांना किती निर्यात झाली?