बांग्लादेशातील हिंसाचारामुळे भारतातील शेकडो ट्रक कांदा सिमेवरच, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र
बांग्लादेशातील अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. बांग्लादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात थांबली आहे. बांग्लादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करत असल्यानं या घडामोडींनी दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात. नाशिकहून बांग्लादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांग्लादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की येण्याची शक्यता
एका ट्रकमध्ये 30 टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांग्लादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांग्लादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की ओढवू शकते. 50 हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील 85 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा सील केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्यानं रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत.
बांग्लादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करा, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र
दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. बांग्लादेशातील अस्थिर परिस्थितीमुळं भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्यानं कांद्याची वाहतूक होत नसल्याचं राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. बांग्लादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांग्लादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
दोन्ही देशादरम्यान मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात
भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांग्लादेशमध्ये सध्या हिंसाचार सुरु आहे. या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. गेल्या दोन तीन दिवसात हिंसाचारात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिंसाचारग्रस्त बांग्लादेशशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात करतात.
अशाच हवामान अपडेट, दररोजचे ताजे शेतमाल बाजारभाव आणि सर्व शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇