हरभऱ्याचे वाढते उत्पादन आणि आयात – दर हमीभावाच्या खाली जाणार का?
देशातील बाजारात सध्या आयात झालेला हरभरा ५ हजार ८०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. देशात यंदा हरभरा पेरणी वाढल्याने उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच सरकारने आयात खुली केल्याने आयातही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नव्या हरभऱ्याची बाजारात आवक सुरु झाल्यानंतरही काही काळ हमीभावाच्या खाली राहण्याचा अंदाज आहे.
मात्र बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. मात्र सरकार खुल्या आयातीला मार्चनंतर मुदतवाढ देते का? याकडे बाजाराचे लक्ष असेल.
सरकारने देशात हरभरा डाळीचे भाव वाढल्यानंतर हरभऱ्याची आयात मे २०२४ मध्ये खुली केली होती. हरभरा आयातीवर ६६ टक्के शुल्क होते. ते सरकारने शुन्य केले. हरभऱ्याची आयात मार्च २०२५ पर्यंत खुली असेल. त्यामुळे देशात हरभरा आयात वाढली. चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेबर २०२४ या काळात देशात चांगलीच वाढली.
देशात २ लाख ३९ हजार टन हरभरा आयात झाली. तर ऑस्ट्रेलियातून यंदा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बाजारातील वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात यंदा मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन होणार आहे. तर ऑस्ट्रेलियातून १० लाख टन हरभऱ्याची खेप बाहेर निघाली आहे. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक माल भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात मार्च महिन्यापर्यंत तरी चांगली आयात होण्याची शक्यता आहे.
देशात यंदा हरभऱ्याची पेरणी देखील वाढली आहे. ९८ लाख हेक्टरवर पेरा झाला. यंदा पिकाला फटका बसत असला तरी उत्पादन वाढीचे अंदाज आहेत. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारात नवा हरभरा दाखल झाला. मात्र आवकेचे प्रमाण नगण्य आहे. हरभरा आवकेचा दबाव फेब्रुवारीच्या शेवटपासून वाढायला सुरुवात होईल. तसेच मार्च आणि एप्रिल महिन्यात आवकेचा दबाव असेल. या काळात देशातील उत्पादन आणि आयातीचा माल याचा दबाव बाजारावर राहू शकतो.
बाजारात जेव्हा आवकेचा दबाव राहील आणि आयातही मुक्त राहील या काळात हरभरा बाजारभाव हमीभावाच्याही खाली राहण्याची शक्यता आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात आयात हरभऱ्याला ५ हजार ८०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारात आवक वाढल्यानंतर हरभरा भाव ५ हजार २०० रुपयांपासून सुरु होऊ शकतात. तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मार्केट ५ हजार ५०० ते ६ हजारांच्याही दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.