द्राक्ष पिकातील भुरी रोग: शेतकऱ्यांसाठी कारणे, लक्षणे आणि प्रभावी नियंत्रण उपाय!

द्राक्ष पिकातील भुरी रोग: शेतकऱ्यांसाठी कारणे, लक्षणे आणि प्रभावी नियंत्रण उपाय!

द्राक्ष पिकातील भुरी रोग: शेतकऱ्यांसाठी कारणे, लक्षणे आणि प्रभावी नियंत्रण उपाय!

 

द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यतः डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, अॅन्थ्रकनोज, जीवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाचे रोगांचा सर्व द्राक्ष विभागात दिसून येतो. या रोगांमुळे मोठे नुकसान होते. या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या रोगांची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

आजच्या लेखामध्ये द्राक्ष पिकातील भुरी या रोगाविषयी माहिती घेऊ. या रोगाला ‘पावडरी मिल्ड्यू’ असेही म्हणतात. हा रोग द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणीच्या शेवटी तसेच ऑक्टोबर छाटणीच्या सुद्धा शेवटच्या टप्प्यावर आढळून येतो. नाशिक विभागापेक्षा सांगली, सोलापूर या विभागामध्ये कोरडे हवामान स्थिती झाल्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येतो.

 

रोगाची ओळख :
रोगाचे नाव : भुरी रोग (Powdery Mildew)
रोगाचे कारण : हा रोग बुरशीमुळे होतो.
बुरशीची डिव्हिजन : Ascomycota
शास्त्रीय नाव : Uncinula necator

 

बुरशीचे वैशिष्ट्ये : ही बुरशी एक्टोपॅरासाइट (Ecto parasite) असते. म्हणजे या बुरशीचे तंतू पानांच्या आतमध्ये न जाता वरील भागात राहतात. आणि झाडामधून अन्नद्रव्ये शोषण करतात.

परजीवी प्रकार : ही बुरशी Obligate या प्रकारात येते. ही बुरशी ज्या पिकावर वाढते, तिला जिवंत ठेऊन त्यातील अन्नद्रव्ये शोषण करते. तिचे संपूर्ण जीवनचक्र एकाच यजमान पिकावर पूर्ण करते.

नुकसान : या रोगामुळे पिकाचे ३० ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके : सर्व द्राक्ष वाणांवर आढळून येते. इतर पिकांवर ही प्रजाती दिसत नाही.

 

लक्षणे :
रोगाची लक्षणे पाने, फळे, फांदी यावर दिसून येतात.
सुरवातीला जुन्या पानांवर वरच्या बाजूने पिवळसर ठिपके दिसून येतात. नंतर या ठिपक्यांवर पांढरी ते राखेडी पावडर पडल्यासारखी वाढ दिसून येते. ही वाढ ‘डाऊनी मिल्ड्यू’ सारखी फुललेली नसून पानाला चिटकून असते.
रोगाची तीव्रता जास्त असेल तर ही वाढ पानांच्या खालील बाजूस देखील दिसून येते. अशीच वाढ फळे आणि फांद्यांवर देखील दिसून येते.
रोगाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश वेळा पाने वरील बाजूला वळालेली दिसतात. बुरशी जिवंत असते, तोपर्यंत ती जागा पांढरी दिसते. जेव्हा बुरशी नियंत्रणात येते, तेव्हा ती जागा काळसर रंगाची दिसते.

 

पोषक वातावरण :
हा रोग शक्यतो द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात डिसेंबर नंतर आढळून येतो. पानांवर पाणी असल्यावर बिजाणूंचे अंकुरण होत नाही. यामुळे रोगाची लागण होण्यासाठी पाने कोरडी असणे आवश्यक असते.
तापमान १० ते २० अंश सेल्सिअस, जास्त आर्द्रता अशी वातावरण स्थिती रोगासाठी अत्यंत पोषक असते. अशा वातावरणात बीजाणूचे अंकुरण चांगले होते.
तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे आणि आर्द्रता ४० टक्के च्या खाली गेल्यास रोगाची लागण होत नाही.

 

रोग कसा येतो :
द्राक्ष पिकाची अवस्था नसताना भुरी रोगाचे तंतू व बीजाणू झाडावर, मातीमध्ये किंवा इतरत्र जिवंत राहतात. जेव्हा द्राक्ष पिकाची योग्य अवस्था व पोषक वातावरण तयार झाल्यानंतर बुरशीच्या बीजाणू व तंतुंच्या मार्फत द्राक्ष पिकावर रोग निर्माण होतो. याला ‘प्राथमिक लागण’ असे म्हणतात. यानंतर बुरशी मोठ्या प्रमाणात बिजाणूंची निर्मिती करते. या बिजाणूंच्या मार्फत पुढील रोगाचा प्रसार होतो, याला ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

 

भुरी रोग लैंगिक व अलैंगिक अशा दोन्ही प्रकारचे बीजाणू तयार करतात. लैंगिक बिजापुंना ‘क्लीस्टोथेसिया’ (Cleistothecia) व अलैंगिक बिजापुंना ‘कोनिडीया’ असे म्हणतात. लैंगिक बीजाणू हे अति थंड प्रदेशात तयार होऊन सुप्त अवस्थेत जातात. त्यामुळे आपल्या येथील वातावरणात हे बीजाणू तयार होत नाहीत. आपल्याकडे फक्त अलैंगिक कोनिडीया तयार होतात.

 

सूक्ष्मदर्शिकखाली काय दिसते ?
सूक्ष्मदर्शिकखाली बुरशीच्या पृष्ठभागावर पसरलेले तंतू आणि अलैंगिक बीजाणू (कोनिडीया) स्पष्टपणे दिसतात. बीजाणू दंड गोलाकार रंगहीन असतात. हे बीजाणू बीजाणूदंडावर साखळीसारखे एकमेकांवर एक असे असतात. त्या बिजाणूंमध्ये एक ते दोन रिक्तिका (Vacuoles) असतात. या कोनिडीयाची लांबी ०.०३ ते ०.०४ मिलिमीटर, तर रुंदी ०.०१ ते ०.०२ मिलिमीटर इतकी असते.

 

नियंत्रणाचे उपाय :
फांद्यांची खूप गर्दी नसावी.
रोगग्रस्त पाने बागेबाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. रोगग्रस्त पाने बागेत टाकू नयेत.
जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
जैविक बुरशी जसे की अॅम्पेलोमायसिस क्विसक्वॅलीस (Ampelomyces quisqualis) याची फवारणी रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी किंवा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर करावी. तसेच बॅसिलस सबटिलीस (Bacillus subtilis) चा फवारणीद्वारे वापर रता येईल.
पोटॅशिअम बायकार्बोनेटची देखील फवारणी घेता येते.
पोषक वातावरणात शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.
फवारणीसाठी पाणी मात्रा जास्त वापरावी (५०० ते ६०० लिटर)
फवारणीचे कव्हरेज चांगले होईल याची काळजी घ्यावी.
शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा. जास्त धोकादायक (High Risk) बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच करावा.

 

हे पण वाचा : पाईपलाइन योजनेचा संदेश आला का? ७ दिवसांत ‘हे’ महत्त्वाचे काम करा, अन्यथा समस्या होऊ शकते!

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com