द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा निर्मितीकडे वाढता कल; यंदा बाजारभाव कसा राहणार?
जत पूर्व भागात द्राक्ष काढणीची धांदल सुरू झाली आहे. गेल्यावर्षी पाऊसपाणी कमी पडल्याने काडी तयार झाली नाही. घड जास्त सुटले नाहीत. सध्या द्राक्षाला ३५ ते ४० रुपये किलो दर मिळत आहेत.
महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नाही. सध्या बाजारात बेदाण्याला चांगला दर असल्यामुळे बेदाणानिर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
विक्री करण्यासाठी उत्पादित द्राक्षांचा बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊस फुल झाली आहेत. जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंडा माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत.
तालुक्यात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाबागा आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून छाटणी केली आहे. यावर्षी द्राक्षाला वातावरण अनुकूल असल्याने औषधाचा खर्च कमी आला आहे.
पाणीटंचाई, औषधे व खतांच्या वाढत्या किमती, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष बागायतदारांनी अनेक अडचणीवर मात करत द्राक्षबागा फुलवल्या आहेत.
यावर्षी उत्पादन कमी आल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे. रासायनिक खते, औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च वाढला आहे.
मजुरांची टंचाई
– द्राक्षे शेडवर टाकणे, बेदाणा शेड झाडणे, पेटी पॅकिंग करणे आदी कामे मुजरांकडून करावी लागत आहेत.
– दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
– द्राक्ष काढणीस महिलांना ३५० रुपये तर पुरुषाला ४०० रुपये मजुरी मिळत आहे.
– द्राक्षे काढण्याची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई भासत आहे.
पाण्यावरील खर्च वाढला
गेल्यावर्षी उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याने टँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. कूपनलिका, विहीर खोदाई करून लाखो रुपये खर्च केले आहेत.
बेदाण्याला चांगला दर
आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम कौशल्याची जोड तसेच कोरड्या हवामानामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. सध्या बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. प्रतिकिलो दर १९० ते २०० रुपये दर मिळात आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात जमिनीच्या क्षमतेनुसार पिकांना पाणी देण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!