सध्या महाराष्ट्रात 86.90 टक्क्यांवर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या, कृषी विभागाने दिली माहिती
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या आता खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभागाने दिलेल्या पीक पेरणी अहवालानुसार, महाराष्टात ८६.९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून १२३ लाख ४१ हजार ५१७ हेक्टरवर या पेरण्या झाल्या आहेत.
मागील वर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, यंदा जुन महिन्यात चांगला पाऊस झाल्याने आता खरीप पेरण्या जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र आहे.
सोयाबीनची ११५ टक्के पेरणी
मागील पाच वर्षांच्या पेरण्यांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात तब्बल ११५ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अजूनही हमीभावाच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीन पिकावर विश्वास दाखवला असून ११५ टक्के पेरणी केली आहे. ४७ लाख ७० हजार ४९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी यंदा झाली आहे.
खरीप ज्वारी ३१.२ टक्क्यांवर
राज्यात यंदा खरीप ज्वारीची 31.2% वर पेरणी झाली असून 90 हजार 188 हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप ज्वारीचे पीक घेतले आहे. कोल्हापूरसह नाशिक विभागात खरीप ज्वारीची पेरणी अधिक झाली असून इतर विभागात तुलनेने कमी पेरणी झाल्याचे अहवालात नोंदवले आहे.
राज्यात कापूस पेरणी 92.63 टक्क्यांवर
राज्यातील शेतकऱ्यांनी 8 लाख 91 हजार 456 हेक्टरावर यंदा कापूस पेरणी केली आहे. नागपूर विभागात 96 टक्के क्षेत्रावर कापूस पेरला असून कोल्हापूर व पुणे विभागात 13 ते20 टक्के अधिक कापूस पेरणी झाली आहे.
मराठवाड्यात यंदा दिलासादायक चित्र
मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपातील पीके धोक्यात आली होती. दरम्यान पावसाच्या खंडामुळे तसेच त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश भागात पिकांनी माना टाकल्या. राज्यभरात सध्या पावसाचा जोर वाढला असून खरीप पेरण्या बहुतांश ठिकाणी झाल्याचे चित्र आहे.
कोणत्या विभागात किती टक्के पेरणी झाली?
नाशिक 84.14%
पुणे 109.41%
कोल्हापूर 103.04%
छ. संभाजीनगर 93.50%
लातूर 94.38%
अमरावती 91.08%
नागपूर 57.70%
_____________________________
एकूण 86.90%