आज राज्यात पावसाचा अंदाज; विदर्भात हलक्या पावसाचा येलो अलर्ट : हवामान अंदाज : 26 फेब्रुवारी 2024
हवामान विभागाने राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा दिला. विदर्भात हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला.
तर वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
तर लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्या म्हणजे मंगळवारीही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला.