आंबा काढणीपूर्वी व नंतरची काळजी: शेतकऱ्यांनी नक्की पाळाव्यात ‘या’ महत्वाच्या टिप्स
आंब्याचा हंगाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी मेहनतीचे फळ मिळवण्याची वेळ. मात्र, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी न केल्यास मेहनतीवर पाणी फिरू शकते. आंबा फळांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी ही अतिशय नाजूक प्रक्रिया आहे. चुकीच्या पद्धतीमुळे फळांचे वजन, चव आणि बाजारभाव यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स व शिफारशी नक्की लक्षात ठेवा.
१. काढणीची योग्य वेळ आणि पद्धत:
• आंबा फळांची काढणी ८५ ते १०० टक्के पक्वतेच्या अवस्थेत झेल्याच्या साहाय्याने, देठासह करावी.
• पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तयार फळे लवकरात लवकर काढून घ्यावीत.
• काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी, जेव्हा उन्हाची तीव्रता कमी असते.
२. रोग नियंत्रण व फवारणी:
• करपा रोगापासून संरक्षणासाठी, १५ दिवस आधी कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम/१० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
• काढणीनंतर फळकूज टाळण्यासाठी, फळे ५०°C तापमानाच्या पाण्यात २० मिनिटे बुडवावी (उष्ण जलप्रक्रिया).
३. काढणी केल्यानंतरची काळजी:
• काढलेली फळे सावलीत ठेवावीत, कारण उष्णतेमुळे साखर प्रमाण वाढून फळ खराब होण्याचा धोका असतो.
• आंब्यांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. दिवसा तापमान जास्त असल्याने फळ खराब होण्याची शक्यता वाढते.
४. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळा:
• बागेत गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
• विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फळमाशी रक्षक सापळे प्रत्येक एकरात दोन प्रमाणात झाडाच्या खालच्या फांद्यांवर लावावेत.
५. फळांचे संरक्षण आणि दर्जा वाढवण्यासाठी पिशव्यांचे आच्छादन:
• गोटी ते अंडाकृती अवस्थेतील आंबा फळांना २५x२० से.मी. आकाराच्या वर्तमानपत्राच्या पिशव्यांनी आच्छादित करावे.
• पिशवे घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
• यामुळे डाग विरहीत, दर्जेदार आणि जास्त वजनाचे फळ तयार होते.
आंबा फळाचे उत्पन्न मिळवताना शेतकऱ्यांनी काढणीपूर्वी आणि नंतर योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास नुकसान टाळता येते. फळांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि बाजारात चांगला दर मिळवण्यासाठी ही शिफारस केलेली पावले अत्यंत आवश्यक आहेत.
हे पण वाचा : गुणकारी अनानसाचे आरोग्यदायी फायदे: शरीरासाठी पोषणाने भरलेले फळ