सिंचन मोटार वारंवार जळते? हे उपाय करून तिचे आयुष्य वाढवा!
विजेवर चालणाऱ्या मोटारी दोन प्रकारच्या असतात. ए.सी. व डी.सी महाराष्ट्रात खेडेगावांत व शेतातून ए.सी. पद्धतीचा वीज पुरवठा असल्यामुळे ए.सी. मोटारीच वापरल्या जातात. एका यंत्राला ज्यावेळी एकाच तारेतून वीज पुरवठा केला जातो, तेव्हा त्याला सिंगल फेज व तीन तारांतून केला जातो तेव्हा त्याला श्रीफेज म्हणतात.
लहान कामासाठी एक अश्वशक्ती हॉर्सपॉवर किंवा त्यापेक्षा कमी शक्तीच्या मोटारींना एक फेजमधून पुरवठा करतात. परंतू जास्त शक्तीच्या यंत्रांना तीन तारांतुन पुरवठा करतात. ए.सी. मोटारी सुरु होतात तेंव्हा सुमारे चौपट विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्यासाठी स्टार्टर वापरतात.
मोटारीची निवड करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
१. मोटारीची किंमत
२. करावयाच्या कामाचे स्वरुपानुसार योग्य अश्वशक्तीची मोटार घ्यावी.
३. दर मिनिटास किती फे-यांची आवश्यकता आहे, पंपाचे, गिरणीचे, चाकाचे फेरे, आरपीएम, लक्षात घेवून ठरवावे.
४. मोटार बसवावयाची जागा ही पाण्याजवळ अथवा धूळ व कचरा अडणारी असेल तर पूर्ण झाकलेली मोटार घ्यावी.
मोटार जळणे
(मोटार तापून तिच्या वेटोळ्यातील तारेवरचा पापुद्रा जाळून वेटोळे काळे पडले की मोटार जळाली असे म्हणतात. मोटार खालील कारणांमुळे जळण्याचा संभव असतो.)
१. कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर त्यापेक्षा जास्त काम करुन घेण्याचा प्रयत्न केल्यास तारेचे वेटोळे हे जास्त विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करते.
२. मोटारीवरील तारेचे वेटोळे पाण्यात बुडणे किंवा ओले होणे.
३. उंदीर, पाली, झुरळे, लहान बेडूक मोटारीत शिरल्या, त्यांचा विद्युत वाहक भागाशी स्पर्श झाल्यास तारांमधील विद्युत प्रवाह अनियमित होवून मोटार जळते.
४. मोटारीतील धूळ, कचरा जास्त असल्यास ती तापते व जळू शकते.
५. मोटारीतील रोटर व स्टार्टर एकमेकांवर घासले गेल्यास मोटार जळते.
वारंवार होणारी बिघाड टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
१. मोटारीवर पाणी उड्डू देऊ नये. मोटार सुरु करण्यापूर्वी ती मध्ये पाणी शिरलेले नाही याची खात्री करुन घ्यावी.
२. मोटारीत कचरा, धूळ, कीटक, पाली, उंदरी वैगरे शिरु नयेत म्हणून तिला झाकण घालावे.
३. मोटारीचे फाउन्डेशन समपातळीत करावे, बेअरिंगला वेळच्या वेळी ग्रीस व वंगण तेल द्यावे.
४. कमी शक्तीच्या मोटारीकडून जास्त शक्तीचे काम घेणे टाळावे.
५. इतर वस्तूंचा टेकु लावून मोटार चालवू नये.
६. मोटार सतत चालवू नये. तिला अधून मधून विश्रांती द्यावी.
७. मोटार जळाल्यास खात्रीच्या ठिकाणाहून रिवाईंडींग करुन घ्यावी.
विजेपासून अपाय होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
१. कोरडया लाकडी फळीवर उभे राहून काम करावे.
२. फयुज तारा बसवितांना रबरी हातमोजे वापरावे.
३. मोटारीचे काम करण्यासाठी सर्व फ्यूज काढुन विजपुरवठा बंद करावा.
४. मोटार चालू असतांना मोटारीच्या कोणत्याही भागाला हात लावू नये.
५. काम संपल्यानंतर मेन स्विच बंद करावा.