शेतीसाठी झेंडू पीक: आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे जाणून घ्या!
प्रत्येक घटक पर्यावरणात त्याचे योगदान देत असतो. झेंडूच्या फुलांची पिकांसाठीची उपयुक्तता हेही असेच योगदान आहे. म्हणूनच कदाचित झेंडूला सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असेल.
सणांच्या दिवसांमध्ये कोणत्या फुलाला जास्त महत्त्व आहे, तोरण म्हणून दारात आपण कोणती फुले वापरतो, असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर फारसा विचार न करता लगेच उत्तर सांगता येते, झेंडू हो अगदी बरोबर झेंडूच.
झेंडू हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे फूल आहे. हे बारमाही फूल आहे. दसरा, दिवाळी, पाडवा या सणांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलाला मागणी असते. रोजच्या देवपूजेतही या फुलांना मोठा मान असतो.
झेंडूचा वापर अनेक धार्मिक विर्धीमध्ये आणि उत्सवांमध्ये केला जातो. मांगल्याचे प्रतीक एवढी झेंडूची ओळख आपल्याला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, की झेंडूमध्ये औषधी आणि कीडनियंत्रण करणारे गुणधर्म आहेत?
पालघर जिल्ह्यामध्ये मी पुकार संस्थेमार्फत ‘जल, जंगल, जमीन, जानवर, जीवन’ नावाच्या प्रकल्पावर काम करत आहे. आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत शेतीचे प्रयोग करत आहोत. याच कामादरम्यान मी झेंडूच्या फुलाचा कीड नियंत्रण करणारा गुणधर्म पाहिला.
पिकांवर येणारी कीड मारण्यासाठी शेतकरी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात हे आपल्याला माहीत आहे परंतु अशी रासायनिक फवारणी टाळण्यासाठी आम्ही झेंडूच्या फुलांची मदत घेतली.
पावसाळा सुरू झाला तेव्हा शेताच्या बांधावर आणि पिकांमध्ये जेथे जागा मिळेल तेथे आम्ही झेंडूची रोपे लावली. एकप्रकारे संपूर्ण शेताला झेंडूच्या रोपांचे कुंपणच केले. साधारण दोन महिन्यांत रोपे चांगलीच वाढली.
आफ्रिकन झेंडू या प्रजातीची मोठी पिवळी आणि नारंगी रंगाची झेंडूची आकर्षित फुले प्रचंड संख्येने फुलली. शेतात नजर जाईल तेथे झेंडूची फुले लक्ष वेधून घेत होती. या फुललेल्या झेंडूवर अनेक कीटक आकर्षित झाले.
पिकांचे नुकसान करणारी पांढरी माशी आणि फळ पोखरणारी कीड यासारखे शोषक किडे हे झेंडूवर येऊन बसल्याने शेतातील पिकांचे रक्षण झाले आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर न करता पिकांवर पडणारी कीड नियंत्रित करता आली.
यासोबतच झेंडूच्या मुळांमधून जे संप्रेरक जमिनीत मिसळते त्यामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा बंदोबस्त होण्यासही मदत झाली. झेंडूला मुख्य पिकात आंतरपीक म्हणून घेतल्यामुळे पिकाचा फायदाही झाला.
आमच्या शेतात झेंडूच्या फुलांवर मधमाशा आणि मित्र कीटकांचा वावर वाढला आणि त्यांनी शेतातील पिकांसाठी परागीभवनाचे काम केले. झेंडूच्या निरीक्षणातून माझ्या लक्षात आले की, निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना पूरक आहे.
प्रत्येक घटक पर्यावरणात त्याचे योगदान देत असतो. झेंडूच्या फुलांची पिकांसाठीची उपयुक्तता हेही असेच योगदान आहे आणि म्हणूनच कदाचित झेंडूला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असेल.
निसर्ग खरच किमयागार आहे. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग आपल्याला सर्व घटकांचा परस्परांशी असलेला संबंध दाखवत असतो. आपण निसर्गाच्या सहवासात या किमया पाहत जगणे ही जगण्याची मजा आहे