वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी परिपूर्ण खत व्यवस्थापन: भरघोस उत्पादनाचे रहस्य!
Vegetable Management: वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे योग्य आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी लागवडीपासूनचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन इत्यादी तांत्रिक बाबी विचारात घेऊन सुयोग्य नियोजन अपेक्षित असते. या लेखातून वेलवर्गीय पिकास खतांचे योग्य व्यवस्थापनकसे करावे हे जाणून घेणार आहोत…
खत व्यवस्थापन
• वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.
• दोडका, कलिंगड, खरबूज पिकाला प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा आवश्यक आहे. यापैकी अर्धे नत्र (२० किलो), संपूर्ण स्फुरद (२० किलो) व संपूर्ण पालाश (२० किलो) लागवडीवेळी द्यावे.
• नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (२० किलो) लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी तीन समान हप्त्यांत विभागून बांगडी पद्धतीने रोपांच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावी.
• खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
• काकडी, दुधी भोपळा, कारले पिकाला प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा आवश्यक आहे. यापैकी अर्धे नत्र (२० किलो), संपूर्ण स्फुरद (२० किलो) व संपूर्ण पालाश (२० किलो) लागवडीवेळी द्यावे.
• नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (२० किलो) लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी दोन समान हप्त्यांत विभागून बांगडी पद्धतीने रोपांच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावी. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
• सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी, आवश्यकतेनुसार लागवडीवेळी एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅगनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स शेणखताबरोबर अथवा निंबोळी पेंडीसोबत मिसळून द्यावे.