बांबू लागवड: वेगवान उत्पादन, पर्यावरण संरक्षण आणि रोजगार निर्मितीचा उत्तम पर्याय
Bamboo Farming : बांबू वेगाने वाढतो. बांबूच्या मुळाचे जाळे इतर वनस्पतीपेक्षा दाट असल्यामुळे जमिनीची धूप कमी होते. मुळांच्या दाट जाळ्यामुळे पावसाचे पाणी इतर वृक्षांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मुरते. बांबूचा वापर बांधकाम, फर्निचर, औषध, खाद्य, वाद्य निर्मिती इत्यादीसाठी केला जातो.
अलीकडे बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर वीज निर्मितीसाठी, बायोगॅस, बायो इथेनॉल, बायो सीएनजी, बायो ऑईल, कोळसा, बायो प्लॅस्टिक किंवा कोपॉलीमर, कापड मजबुतीकरण इत्यादींमध्ये केला जातो. बांबू कोंबाचा आहारात वापर केल्यास वजन कमी होते, कोलेस्ट्रोलचा स्तर संतुलित होतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांचा पुरवठा होतो.
बांबू लागवडीपासून ३ ते ४ वर्षांत उत्पादन सुरू होते. बांबूचे उत्पादन सुरू होईपर्यंत सुरुवातीच्या दोन वर्षात आंतरपीक घेता येते. बांबूची तोड चौथ्या वर्षापासून प्रत्येक वर्षी करण्यात येते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता या पिकात आहे.
बांबूपासून बायो इथेनॉल, बायो सीएनजी गॅस निर्मिती करता येते. हे पीक १९२७ च्या वन संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही, कारण शासनाने बांबूला झाडाच्या श्रेणीतून काढून गवताच्या संवर्गात दाखल केले आहे. त्यामुळे बांबू लागवड किंवा तोड करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही.
बाल्कोवा
•उंची : १६ ते २३ मीटर
•व्यास: ६ ते १५ सेंमी., जाडी : १ ते ४ सेंमी.,
• रोप निर्मिती: टिश्युकल्चर, खोड, कंद.
•लागवड : प्रति एकरी २०० रोपे. ५ मी. ४ मी. किंवा धुऱ्यावर दोन ओळींत लागवड.
• उत्पादन : लागवडीपासून चौथ्या वर्षी परिपक्व बांबू मिळण्यास सुरुवात.
•विक्री संधी : पेपर मिल, स्थानिक व्यापारी, फर्निचर प्रकल्प, घर
•बांधकाम, इंटेरिअर डेकोरेशन,
• सीएनजी बायोगॅस, बायो इथेनॉल, वीज निर्मितीसाठी.
मानवेल
•उंची: ८ ते १६ मीटर.
•व्यास : २.५ ते ८ सेंमी, जाडी : ०.५ ते २ सेंमी.
• रोप निर्मिती : टिश्युकल्चर, बियाणे, खोड, कंद.
• लागवड : प्रति एकरी २५० रोपे. ४ मी. ४ मी. किंवा धुऱ्यावर दोन ओळींत
लागवड
• विक्री संधी: पेपर मिल, स्थानिक व्यापारी, अगरबत्ती, फर्निचर प्रकल्प, इमारत बांधकाम, इंटेरिअर डेकोरेशन इत्यादी.