अवकाळी पावसामुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत, पिकांचे आणि गुरांचे मोठे नुकसान…

अवकाळी पावसामुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत, पिकांचे आणि गुरांचे मोठे नुकसान…

 

जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तब्बल १ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सहा दिवसांमध्ये वीज पडून तिघांचा, तर दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे.

तर ३ हजार १८४ घरे व गोठ्यांचे नुकसान सुद्धा झाले आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या १४ दिवसांतच सरासरीच्या तीनपट पाऊस बरसला असून, १४ ऑक्टोबर रोजी ११ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

या पावसामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यामधील नऊ तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलढाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा तालुक्यात या पावसाने जोर दिला आहे.

या नऊही तालुक्यामधील ५७७ गावातील १ लाख २९ हजार ५११ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तसेच प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, भाजीपाला, मका, तूर, केळी, झेंडू, पनवेल आणि शेवगा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील ६५ हेक्टर शेत जमीन खरडून गेली असल्याचे दिसून येत आहे. ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान प्रामुख्याने हे नुकसान झाले असून, १४ ऑक्टोबरची आकडेवारी अद्याप यात समाविष्ट झालेली नाही.

ऑक्टोबरच्या १४ दिवसातच तिप्पट पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात १४ ऑक्टोबरपर्यंत सरासरी २५.८ मिमी पावसाची नोंद होत असते.

पण या वर्षी प्रत्यक्षात ७९.२ मिमी पावसाची नोंद झालेली असून सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस ३०७.१ टक्के पडला आहे. जून ते १४ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्याचा विचार करता सरासरीच्या १२५ टक्के हा पाऊस पडल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्रातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी ११ मंडळांत अतिवृष्टी ..!

रविवारी जिल्ह्यात २९ मंडळांत अतिवृष्टी झाली होती. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पुन्हा ११ मंडळांत अतिवृष्टी झाली. मलकापूर तालुक्यामधील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

बुलढाणा ७१.३, मलकापूर-१०८.३, दाताळा- ९७.५, नरवेल-१०४.८, धरणगाव-१०८.८, जांभूळ- १६६, बोराखेडी-७०, रोहीणखेड-६६, शेलापूर-७२, शेंबा-९०.३, चांदुरबिस्वा-९७.३ मिमी पाऊस झाला.

१०९ गुरांचा मृत्यू :

या अवकाळी पावसादरम्यान जिल्ह्यामध्ये १०९ गुरांचा संग्रामपूर, मलकापूर आणि देऊळगाव राजा तालुक्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये ९८ लहान गुरे तर ११ मोठ्या गुरांचा समावेश आहे.

९ तालुक्यांना बसला फटका (क्षेत्र हेक्टरमध्ये) :

क्र. तालुका बाधित गावे शेतकरी संख्या नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर)
1 बुलढाणा 48 2,725 875
2 चिखली 5 3,348 2,600
3 मोताळा 126 21,182 18,240
4 मलकापूर 75 12,570 24,966
5 खामगाव 18 389 268
6 नांदुरा 52 24,000 31,513
7 जळगाव जा. 110 32,068 30,813
8 संग्रामपूर 106 32,980 37,307
9 सिंदखेड राजा 4 1,749 498

 

अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जोडले जा

https://chat.whatsapp.com/LicS8Fu6gePAvHjO3WeBo9

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com