फर्टिगेशन संरचना व्यवस्थापन तंत्र
अकोला येथील विद्यापीठ प्रक्षेत्रावर घेतलेल्या तीन वर्षांच्या सलग प्रयोगामध्ये ठिबक सिंचन, १२६ टक्के अधिक शिफारशीत खतमात्रा फर्टिगेशनद्वारे चार वेळा विभागून देणे आणि गळ फांदी कापणे, शेंडे खुडणे अशा संरचना तंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांना २०.३८ टक्के उत्पादन वाढ मिळू शकत असल्याचे समोर आले आहे.
बीटी कापूस वाणांचा वापर सुरू झाल्यापासून योग्य व्यवस्थापनातून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ लागले आहेत. मात्र अनेक शेतकरी हे केवळ खतांचा अतिवापरातून उत्पादनात वाढ मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. संरक्षित ओलित आणि अन्नद्रव्यांच्या वापरातून पिकाची कायिक वाढ जास्त होण्याचा धोका असतो. नुसतीच कायिक वाढ अधिक झाल्यास पिकाची कालावधी वाढतो.
तसेच फूल, पात्या व बोंड गळ होऊन कापूस पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी राहण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी कापूस पिकाच्या संरचनेत बदल करण्याची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस संशोधन विभागातील कृषी विद्यावेत्ता व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे यांनी कापूस संशोधन प्रक्षेत्रावर सलग तीन वर्षे प्रयोग केले.
या प्रयोगामध्ये काही ठरावीक कालावधीत गळ फांद्या म्हणजेच कायिक फांद्या कापणे, कापूस पिकाच्या कालावधीनुसार किंवा वाढीनुसार (उंचीनुसार) शेंडे खुडणे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मजुरांअभावी पर्याय देण्याच्या उद्देशाने वाढरोधक संजीवकाच्या वापराचेही प्रयोग करण्यात आले. तीन वर्षांच्या प्रयोगामध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरातूनच कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होत असल्याचे दिसून आले. नुकत्याच ७-९ जून दरम्यान अकोला येथील विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन सभेमध्ये या संशोधन निष्कर्षांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ही संशोधन शिफारस राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
अशाच हवामान अपडेट, दररोजचे ताजे शेतमाल बाजारभाव आणि सर्व शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो क्रांती व्हाट्सअँप ग्रुपला जोडले जा👇