पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक
केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी तीन हफ्त्यांत ही रक्कम दिली जाते. मात्र या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लीक केल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लिक करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
हा एका प्रकारची सायबर फसवणूक आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होते. मोबाईल आणि सीमकार्डचा कंट्रोल घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागू शकतो.
वर नमूद केलेल्या पद्धतीने सायबर फ्रॉड, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी लगेच 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करावी.
तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. तसेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊनही तुम्ही या योजनेचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.