गळ्यात कांद्याची माळ, हातात दुधाची बाटली घेऊन शेतकरी थेट मतदान केंद्रावर
उस्थळ दुमाला, ता. नेवासा इथं एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर जात मतदान केलं.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. आत्तापर्यंत देशातील तीन टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली आहे. आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघातही मतदान होत आहे. दरम्यान, उस्थळ दुमाला, ता. नेवासा इथं एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे.
कांद्याच्या आणि दुधाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त
अहमदनगर जिल्ह्यातील उस्थळ दुमाला येथील शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी त्रिंबक भदगले यांची सर्वत्र चर्चा होत आहे. भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून आणि हातात दुधाची बाटली घेऊन मतदान केले. सध्या कांद्याला आणि दुधाला दर नसल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकरी त्रिंबक भदगले यांनी निषेध नोंदवण्यासाठी हातात दुधाची बॉटल आणि गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केल्याचे पाहाला मिळालं.
कांद्यावरील निर्यातबंदी हटवली तरीही दरात घसरण
दरम्यान, सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीय. कांद्यावरील निर्यातबंदी हटवून देखील दरात घसरण होताना दिसतेय. राज्यातील बहुतेक बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव अजूनही 1,2,3 आणि 4 रुपये प्रति किलो आहे. तर सरासरी भाव हा 13 ते 15 रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे कमाल किंमत 18 रुपये ते 25 रुपये आहे. पाच महिन्यांपासून कांदा निर्यातबंदी उठवूनही मंडईतील शेतमालाला भाव वाढला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरात घसरण होत असल्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातवर बंदी घातली होती. आता म्हणजे 3 मे रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंधन सरकारन उठवली आहेत. मात्र, हे करत असताना सरकारनं कांद्याची निर्यात करताना काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यामुळं कांद्याची निर्यात करणं अवघड होत आहे. त्यामुळं निर्यातबंदी हटवूनही कांद्याची निर्यात होताना दिसत नाही. निर्यातच झाली नाही तर कांद्याच्या दरात कशी वाढ होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळं सरकारनं कांदा निर्यातबंदी हटवताना लावलेल्या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.