गांडूळ खत तयार करण्याची योग्य व सोपी पद्धत
गांडूळ खतात पिकाच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळखत म्हणजे काय ?
गांडूळ हा जमिनीत राहून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग ठेवून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत vermicompost fertilizer किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वत:च्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो.
गांडूळाचे प्रकार : –
- एपिजिकः ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
- अॅनेसिकः ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
- एण्डोजिकः ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असून रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
गांडूळ खत तयार करण्याची योग्य पद्धत
- गांडूळखत vermicompost तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 3 फूट रूंदीचे ढीग तयार करावेत.
- प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस किंवा गव्हाच्या काड्या यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सेंमी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा.
- थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे सोडावीत.
- साधारणत: 100 कि.ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत (vermicompost fertilizer) तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत.
- दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे.
- संपूर्ण ढिगाची उंची २ फूट पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.
- ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
खत तयार होण्यास लागणारा कालावधी :
गांडुळाचा वापर करून गांडुळ खत(gandul khat) तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
गांडुळांच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी –
- एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त 2,000 गांडुळे असावीत.
- बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रूपासून गांडुळांचे संरक्षण करावे.
- मीठ,रासायनिक खते, कीटकनाशके,यापासून गांडूळाना शक्यतो दूर ठेवावे.
- काच,प्लास्टिक,रबर,चिनी माती याचा वापर अजिबात करू नये.
- संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे.
- गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
- ताजे शेण उष्ण असल्यामुळें ते वापरल्यास गांडुळे मरतात त्यामुळे हे वापरू नये.
- गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा 40 ते 45 टक्के ठेवावा.
- गांडुळे हाताळताना किंवा गांडूळ खत vermicompost वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडुळे वेगळी करावीत, जेणेकरून इतर गांडुळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
गांडूळ खताचे फायदे : –
- जमिनीचा सामू उदासीन करण्यास मदत होते.
- गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
- जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
- उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
- जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
- जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
- गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
- रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.
- पिकाचे उत्पादन वाढते.
गांडूळ खत बेड पाहिजे असल्यास खालील लिंकवर जा