यंदाचा मान्सून कसा असेल? स्कायमेटचा मान्सून अंदाज…
यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. स्कायमेटने या हंगामात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होता, ज्यामुळे अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यावेळी पावसाळ्यात दिलासा मिळेल. स्कायमेटने या हंगामात सामान्य ते चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यंदा मान्सून कसा असेल?
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस पडेल. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं (El Nino) ला निनो (La Nina) मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
ला निनोमुळे चांगला पाऊस होण्याची शक्यता
गेल्या वर्षी 2023 मध्ये मान्सून कमकुवत दिसला होता, परंतु या वर्षीचा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निना परिस्थिती जून ते ऑगस्ट दरम्यान उद्भवेल. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस अपेक्षित आहे.
यंदा मान्सून वेळेवर पोहोचेल
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यापर्यंत अल निनोचं ला निनामध्ये रूपांतर होईल. यामुळे मान्सून वेळेवर पोहोचेल. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात उच्च तापमान कायम राहिल्यास तीव्र चक्रीवादळे आणि मुसळधार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. एल निनो संपल्यानंतरही जागतिक तापमानातील विसंगती कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे तापमान स्थिर राहू शकते.
सरासरी 96-104 टक्के पावसाचा अंदाज
स्कायमेटने या हंगामासाठी आपला मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, भारतात 2024 मध्ये समाधानकारक मान्सून येण्याची अपेक्षा आहे. आगामी मान्सूनमध्ये 102 टक्के सामान्य पर्जन्यमान असेल. मान्सून दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 96-104 टक्के राहील असा अंदाज आहे. यापूर्वी, स्कायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजानुसार 2024 मध्ये मान्सून सामान्य राहील असे सूचित केले होते. यानंतरही ते संकेत कायम आहेत.